विधान परिषद निवडणूक – राष्ट्रवादीत कोट्यवधींच्या ऑफरपासून व्हिडिओपर्यंत लॉबिंग:'एमएमडी' फॅक्टर राबवण्याचीही मागणी

0
730-x-548-new-2026-04-21t094425701_1777091650.jpg




महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकूण 9 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसह 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. या दहा जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. मात्र, या एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक इच्छुक आपापल्या पद्धतीने नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. काही जण शिष्टमंडळाच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत, तर काही जण जुने राजकीय आश्वासनांचे व्हिडिओ पुढे करत आहेत. काही इच्छुकांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहून आपली मागणी मांडली आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून संधी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, नाझेर काझी, सुनील मगरे, सुरेश बिराजदार, अमरसिंह पंडित, संजय दौंड, कल्याण आखाडे आणि सुरेखा ठाकरे यांसारख्या नेत्यांनीही शिष्टमंडळाद्वारे संपर्क साधत आपली बाजू मांडली आहे. काहींनी अजित पवारांनी पूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. दरम्यान, या उमेदवारीच्या शर्यतीत पैशांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षनिधीच्या नावाखाली काही इच्छुकांनी कोट्यवधी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. एका माजी खासदाराच्या मुलानेही मोठी रक्कम देण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रक्रियेत आर्थिक बाबींचा प्रभाव असल्याचा आरोपही होत आहे. याचबरोबर, काही नेत्यांनी सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे केला आहे. आतापर्यंत मराठा आणि मुस्लिम समाजाला संधी मिळाली, मात्र दलित समाजाला प्रतिनिधित्व का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामाजिक न्याय विभागाचे नेते आणि काही कार्यकर्त्यांनी एमएमडी फॅक्टर राबवण्याची मागणी केली आहे. यामुळे पक्षांतर्गत राजकारण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अंतिम निर्णय काय? याकडे सर्वांचे लक्ष सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेसाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी मिळून मोठे संख्याबळ असल्याने त्यांचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीच्या संख्याबळामुळे त्यांना केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून अंतिम निर्णय काय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed