संभाजीनगरच्या पुंडलिकनगरात पोलिसाचा शिवसेना पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला:3 जखमी, कुटुंबीयांनाही मारले, रात्री उशिरापर्यंत शिवसैनिकांचा ठिय्या
![]()
पुंडलिकनगर भागात पोलिस कर्मचाऱ्याने शुक्रवारी (२४ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास सत्ताधारी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विकास नरवडे व त्यांच्या कुटुंबावर चाकू हल्ला केला. हल्ल्यात नरवडे यांच्या गालापासून ते मानेपर्यंत चाकूचे वार आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू होते. यानंतर रात्री जमाव रस्त्यावर जमला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी व जखमी असलेले शेजारी वास्तव्यास आहेत. दोघांच्याही ३ मजली इमारती आहेत. गाडी लावण्यासह अन्य काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात सातत्याने कुरबुरी सुरू असतात. यातूनच त्यांच्यात शुक्रवारी पुन्हा एकदा वाद उफाळला. रात्री एकमेकांना शिवीगाळ सुरू असताना पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या काही सहकारी मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. नरवडे यांना संपवून टाकण्याची भाषा वापरून त्यांच्यावर चाकूने वार केले. यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरातील तिघे जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांची पळून जाण्यास मदत सामान्य लोकांवर पोलिसच चाकूहल्ले करत आहेत. या महिन्यात ३० हून अधिक चाकूहल्ले झाले. विशेष म्हणजे, हल्ला केल्यानंतर अन्य काही पोलिसांनीच आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली आहे. याबाबतीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार आहोत. – राजेंद्र जंजाळ, उपमहापौर पोलिसाचा दुसरा गुन्हा गेल्या रविवारी (१९ एप्रिल)रस्त्यात अचानक ब्रेक मारल्याने मागची गाडी धडकल्याच्या कारणावरून निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने साथीदारासह बांधकाम व्यावसायिकाला अडवून दमदाटी करत लुटले होते. त्यानंतर हा दुसरा प्रकार आहे.
