परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू:घाटीत 20 टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, रुग्णसेवा विस्कळीत
![]()
छत्रपती संभाजीनगर येथील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू असून, याचा परिणाम घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. या संपामुळे घाटी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया सुमारे २० टक्क्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, परिचारिकांना दुहेरी शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे, ज्यामुळे रुग्णसेवेवर ताण वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे ८०० परिचारिकांनी संप पुकारल्याने घाटीतील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रात्री ३० विभागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी वरिष्ठ डॉक्टर्स आणि पथक प्रमुखांना रात्रीच्या वेळीही रुग्णालयात उपस्थित राहून परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिचारिकांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णसेवेचा ताण आता डॉक्टरांवर आला आहे. निवासी डॉक्टर्स तसेच वरिष्ठ डॉक्टर्सनाही परिचारिकांची कामे करावी लागत आहेत. सध्या रुग्णालयात ४०० नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना कामावर घेण्यात आले आहे, मात्र त्यांना कामाचा पुरेसा अनुभव नसल्याने डॉक्टरांना अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. दरम्यान, २४ एप्रिल रोजी घाटी रुग्णालयात एकूण ८९ शस्त्रक्रिया पार पडल्या. यामध्ये २६ मोठ्या शस्त्रक्रिया (मेजर सर्जरी) आणि ६३ लहान शस्त्रक्रिया (मायनर सर्जरी) समाविष्ट होत्या. आर्थोपेडिक आणि सामान्य शस्त्रक्रिया विभागातील दोन नियोजित ऑपरेशन्स रुग्णांची शारीरिक स्थिती योग्य नसल्याने रद्द करण्यात आली. परिचारिकांच्या संपामुळे नियोजित शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम झाला आहे. परिचारिकांच्या कमतरतेमुळे आर्थोपेडिक, सामान्य शस्त्रक्रिया आणि स्त्रीरोग विभागातील सुमारे २० टक्के नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भात अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, ‘सध्या आणीबाणीची परिस्थिती असून, आमचे ६०० निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. लेक्चरर्स आणि पथक प्रमुखांनाही रात्रीच्या वेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’ त्यांनी पुढे सांगितले की, २० टक्के नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी, आपत्कालीन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. दररोज अडीच हजार रुग्णांची ओपीडी घाटी रुग्णालय, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालयात सुरू आहे. सध्या ४०० नर्सिंग विद्यार्थिनींची मदत घेतली जात असून, त्यात आणखी ५० विद्यार्थिनींची भर घालण्यात येणार आहे. आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी परिचारिकांना दुहेरी शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
