चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव
![]()
ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला जलभूषण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार जलक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या गौरवपूर्ण कार्याचे स्मरण म्हणून प्रदान केला जातो. ग्रामविकास संस्थेने दुष्काळी मराठवाड्यात राबवलेल्या या पथदर्शी अभियानाची दखल घेऊन हा पुरस्कार घोषित करण्यात आला. जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत 15 किलोमीटर रुंदीकरण व खोलीकरण, 36 साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे, 2500 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग, 196 हेक्टर डीप सीसीटी आणि 120 शेततळी यांसारखी कामे करण्यात आली. यामुळे भूजल पातळी तीन ते चार मीटरने वाढली असून संरक्षित सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. या कामांमुळे चित्ते नदी खोऱ्यात दूध, भाजीपाला, फळे आणि धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे, ज्याचा पुरवठा छत्रपती संभाजीनगर शहराला केला जातो. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असून भूमिहीनांना गावातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय, संस्थेने गेल्या 25 वर्षांपासून मराठवाडा आणि नाशिक विभागात जलविषयक विविध प्रकल्प राबवून 200 पेक्षा जास्त गावे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त केली आहेत. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानात स्थानिक लोकांनी 2 कोटी 96 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. तसेच, 300 स्थानिक जलमित्र आणि महिलांनी पाणी बचत व पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेतला. या अभियानाची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलपुरुष राजेंद्र सिंह राणा यांच्यासह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यवरांनी प्रकल्पाला भेटी देऊन कौतुक केले आहे. संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी सांगितले की, विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य या यशामागे आहे.
