मुंबईचे भूखंड लुटले जातायत अन् लोढांना केवळ जैन-मारवाड्यांची चिंता!:बाहेरच्या 'भैय्यांच्या' धमक्यांना भीक घालणार नाही; मुंबई बंद करून दाखवाच- संदीप देशपांडे
![]()
मुंबई मनपातील भूखंड लाटण्याचा प्रयत्न बाहेरील लोकं करत आहेत. नर्सिंग कॉलेजचा मोठा भूखंड जेएसडब्ल्यूला देण्यात येत आहे. एक भूखंड जैन इंटरनॅशनलला देण्यात येत आहे. महानगरपालिकेचे भूखंड लुटून खाण्याचे काम लोकं करत आहे, सत्तेमध्ये बसलेले लोकं मनपाचा खजिना लुटवत आहे, असे म्हणत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, मंगलप्रभात लोढा यांच्या पिल्लांना भूखंड देण्यात येत आहे. लोढा हा माणूस मराठी माणसांचा द्वेष करणारा माणूस आहे, तो फक्त जैन, मारवाडी, गुजराती लोकांपुरता मर्यादित आहे. त्यांच्या संस्थाना मोठे करण्याचे काम लोढामार्फत सुरू आहे. त्याला धडा शिकवला पाहिजे. ज्या मुंबईने तुम्हाला मोठे केले त्या मुंबईत मराठी माणसांना डावलण्याचे काम करत आहात. भाजपने काय डोक्यावर पडलेल्या लोकांना मंत्री केले मला कळत नाही. केइएम रुग्णालयाचे नाव बदलायचेच आहे तर आनंदीबाई जोशी यांचे नाव त्या रुग्णालयाला द्यावे. सदावर्तेंची केली कुत्र्याशी तुलना संदीप देशपांडे म्हणाले की, परवाना काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे हरा जर कायदा जर 2012 पासून आहे तर यांना मराठी येत नसताना परमीट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे. प्रताप सरनाईक यांनी परमीट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल प्रश्न विचारताच देशपांडे म्हणाले की कुत्रा आपल्यावर भुंकला की आपण त्याच्यावर भुंकायचे नसते, असे म्हणत सदावर्तेची तुलना कुत्र्याशी केली आहे. भैय्याना धडा शिकवण्याची हीच वेळ संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राला धमक्या दिल्या जात आहे की आम्ही मुंबई बंद पाडू, आम्ही रिक्षा चालवणार नाही आणि मग मुंबई बंद होईल. हे जे धमकी देणारे भैय्ये आहेत त्यांना मराठी माणसाने धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि महाराष्ट्र. बाहेरचा कोणताही भैय्या आम्हाला वेठीस धरू शकत नाही. रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं गरजेचे आहे, 10 ते 12 शब्द मराठीचे आले असे फालतूचे लाड जमणार नाही. साहित्यिकांना माझे सांगणे आहे की शब्द नाही त्यांना भाषाच आली पाहिजे. आमच्याकडे जर पोट भरायचे असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे. उत्तरेतील आक्रमण दक्षिणेतील राज्यांनी एकत्र येत रोखावे संदीप देशपांडे म्हणाले की, केंद्र सरकार हे दक्षिणेतील सर्व राज्यांना एकमेकांशी लढवत असते. मग ते सीमावाद असो की इतर काही. पण दक्षिणेतील सर्व राज्यांनी एकत्र येत उत्तरेतील आक्रमण रोखणं गरजेचे आहे. हिंदी भाषिकांकडून होणारे आक्रमण रोखले नाही तर आपल्या भाषेला धोका आहे. संजय निरुपम हा अतिशय टुकार माणूस आहे, त्यांनी काहीही केले तरी भैय्या लोकं त्यांना मतदान करत नाहीत. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी संप करावाच बघूच द्या, मुंबई कशी बंद करतात. सुरतमधून जसे बाहेर पाठवण्यात आले तसे या लोकांना मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे.
