सुनेत्रा पवारांच्या निर्णयाची कसोटी:NCP मध्ये विधानपरिषदेसाठी रस्सीखेच; एक सीट, सहा इच्छूक, अंतर्गत स्पर्धा तापली
![]()
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष आगामी विधानपरिषद निवडणुकांकडे वळले आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक सहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ एकच जागा निश्चित मानली जात आहे. विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या सुमारे 40 आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे दुसरी जागा जिंकणे पक्षासाठी अवघड मानले जात आहे. मात्र, या एकाच जागेसाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. सहा जण या एका जागेसाठी प्रयत्न करत असल्याने पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची, हा मोठा प्रश्न नेतृत्वासमोर उभा राहिला आहे. या निर्णयामुळे पक्षातील संतुलन आणि आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील आणि विक्रम संजय काकडे यांचा समावेश आहे. यापैकी काही नेते पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत मानले जातात, तर काहींची अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे चर्चा सुरू आहे. त्यामुळे अंतिम निवड करताना अनेक घटकांचा विचार करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका जागेसाठी सहा इच्छूक असल्यामुळे त्यांची निर्णयक्षमता कसोटीवर लागणार आहे. पक्षातील गटबाजी, निष्ठा, कामगिरी आणि राजकीय समीकरणे या सर्व बाबी लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर दरम्यान, दुसरीकडे ठाकरे गटातही हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनीही त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याचे समजते. तसेच सुप्रिया सुळे यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत उमेदवारीच्या घोषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
