सोमेश्वर फाउंडेशनतर्फे 'पुणे आयडॉल 2026' गायन स्पर्धा:4 ते 10 मे दरम्यान; नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध
![]()
शहरातील हौशी गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘पुणे आयडॉल २०२६’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ ते १० मे २०२६ या कालावधीत होणार असल्याची माहिती नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त बिपीन मोदी, जितेंद्र भुरुक, उमेश वाघ, अमित मुरकुटे, महेंद्र पवार, गणेश शेलार, संजय माझिरे, संजय तरडे आणि प्रमोद कांबळे उपस्थित होते. नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, ही स्पर्धा स्व. विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. केवळ एक व्यासपीठ न राहता, गायक कलाकारांसाठी एक मानाचे व्यासपीठ म्हणून ती उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक नवोदित गायकांना मोठी संधी मिळत आहे. संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून सहभागी होणार असल्याने स्पर्धेची प्रतिष्ठा वाढली आहे. ही स्पर्धा चार वयोगटांत आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये लिटिल चॅम्प्स (१५ वर्षांपर्यंत), युवा आयडॉल (१६ ते २५ वर्षे), जनरल आयडॉल (२६ ते ५८ वर्षे) आणि ओल्ड इज गोल्ड (५८ वर्षांवरील) या गटांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गायकांनाही यात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. तसेच, ‘पुणे आयडॉल’ हे सन्मानचिन्हही प्रदान करण्यात येईल. उत्कृष्ट स्पर्धकांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. याव्यतिरिक्त, आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना गायनाची आवड जोपासणाऱ्या पाच निवडक व्यक्तींना दरवर्षीप्रमाणे ‘व्हॉईस ऑफ चॉईस – पुणे आयडॉल’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ गायक उपेंद्रजी भट यांच्या हस्ते ४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृहात होईल. स्पर्धेची अंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडेल. इच्छुक स्पर्धकांनी www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ मे २०२६ आहे.
