आमदार संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी:शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून वाद; व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरणही

0
730-x-548-new-2026-04-23t095959709_1776918571.jpg




शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचे वारे वाहू लागले आहेत. सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. शिवाजी महाराजांविषयी अनादर केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. माहितीनुसार, दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फोनवरील संभाषणात गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. तुला घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीभ कापेल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. या विधानांमुळे प्रकरण गंभीर बनले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही या प्रकरणात आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नसून प्राध्यापक गोविंद पानसरे यांचे आहे. तसेच हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गायकवाड यांना आधी पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही समोर आले. या वादात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकाशकाने गायकवाडांच्या धमक्यांना घाबरून न जाता ठाम भूमिका घेतली. तुम्ही उद्या या आणि माझी जीभ कापा, असे उत्तर देत त्यांनी प्रतिकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय न राहता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही केंद्रित होताना दिसत आहे. व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दरम्यान, या प्रकरणावर वाढता दबाव पाहता संजय गायकवाड यांनी नंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्यात त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याचे दिसते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबतची संवेदनशीलता आणि त्यावरून होणारे राजकीय वाद चर्चेत आले आहेत. पुढील काळात या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed