अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट:भोंदूबाबा प्रकरणात धक्कादायक उलगडा; गर्भपातासाठी नामांकित डॉक्टरांची मदत?
![]()
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. खरातने महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांच्या गर्भपातासाठी काही नामांकित डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या नव्या घडामोडींमुळे केवळ गुन्हेगारी नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. तपास अधिक खोलात जात असल्याने आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरात स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला व्यक्ती म्हणून सादर करत महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत होता. घरगुती अडचणी, वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एका पीडित महिलेच्या गर्भपाताचा मुद्दा समोर आल्यानंतर तपासाची दिशा बदलली. गर्भपात नेमका कुठे आणि कसा करण्यात आला, याचा शोध घेताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, खरातच्या संपर्कात काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्र चालवणारे व्यक्ती होते. पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर त्यांना गर्भपातासाठी औषधे देण्यात येत होती. ही औषधे नियमबाह्य पद्धतीने कशी मिळाली, याचा शोध घेतला असता काही डॉक्टरांनीच ती पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय नाशिक महानगरपालिकेतील एका डॉक्टराचा देखील या प्रकरणात संबंध असल्याचा संशय तपासात पुढे आला आहे. हा डॉक्टर खरातच्या संपर्कात होता आणि काही प्रकरणांमध्ये मदत करत असल्याची शक्यता तपासली जात आहे. काही खासगी सोनोग्राफी केंद्रांमध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे. या सर्व बाबींचा तपास सध्या वेगाने सुरू असून, संबंधितांकडून चौकशी केली जात आहे. कल्पना खरात हिच्याविरोधातही कारवाई दरम्यान, या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधातही कारवाई सुरू आहे. जमीन फसवणूक प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार असल्याचे सांगितले जाते. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र राहाता न्यायालयाने सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे या प्रकरणात तिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
