चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास; कार्डियाक अॅम्ब्युलन्स बोलावली
![]()
दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नवा वळण आले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्याला पोलिस कोठडीत घेऊन दररोज अनेक तास चौकशी केली जात आहे. मात्र मंगळवारी चौकशीदरम्यान त्याची तब्येत अचानक खालावली. त्याला ऑक्सिजन लावण्यात आला आणि तातडीने कार्डियाक अॅम्ब्युलन्स मागवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खरातच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी न्यायालयात वैद्यकीय तपासणीबाबत महत्त्वाची मागणी केली होती. खरातच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. औषधांनी फारसा फायदा होत नसल्याने त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी नेण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीनंतर काही दिवसांतच त्याची तब्येत बिघडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात एसआयटीकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे. खरातशी संबंधित डॉक्टर आणि इतर व्यक्तींची चौकशी सुरू असून नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याची सहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि इतर संबंधांबाबत माहिती घेतल्याचे समजते. चौकशीनंतर त्या व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आले. अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आता गुरुवारी संपणार आहे. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार असून एसआयटीकडून पुढील कारवाई काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. नव्या माहितीच्या आधारे पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचेही आरोप याच प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानेही खरातविरोधात गंभीर आरोप केले आहेत. कळमण येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांनी 11 एकर जमीन दीड कोटी रुपयांना घेण्याचे आश्वासन देऊन केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. उर्वरित रक्कम मागितल्यावर जादूटोण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली आहे.
