प्रीतम मुंडेंचे राजकीय पुनरागमन; पक्षांतर्गतची मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरची धुरा; भाजपचा मास्टरस्ट्रोक
![]()
भाजपने माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणत त्यांना महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळापासून त्या राजकारणात कमी सक्रिय दिसत होत्या, मात्र आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निर्णयानंतर प्रीतम मुंडे यांची राजकीय हालचाल कमी झाल्याचे चित्र होते. स्थानिक निवडणुकांमध्येही त्यांचा सहभाग मर्यादित दिसत होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आता भाजपने त्यांना संघटनात्मक जबाबदारी देत पुन्हा संधी दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी प्रभारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत नेणे हा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्या आगामी काळात अधिक सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपमध्ये जिल्हा प्रभारी नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदलही करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांतच प्रभारी बदलल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला बंटी भांगडिया यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्यांना गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. भंडाऱ्याची जबाबदारी नंतर वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांच्याकडे सोपवण्यात आली. या बदलामागे स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याची चर्चा आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या भूमिकेबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला, तरी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हे बदल केल्याचे सांगितले जात आहे. संघटनात्मक पातळीवर मोठे बदल एकूणच, भाजपकडून राज्यभरात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात येत असून, प्रीतम मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना नव्याने संधी दिली जात आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे मराठवाड्यात पक्षाला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय महत्त्वाचे मानले जात असून, पुढील काळात या बदलांचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
