सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तिसऱ्या दिवशी:नागरिकांचे हाल, तहसील कार्यालयातील कामे ठप्प, आरोग्य सेवा विस्कळीत
![]()
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले बंद झाले आहेत, तर आरोग्य सेवाही कोलमडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या १८ मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीतून कोणताही ठोस उपाय किंवा तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप उद्या, गुरुवारीही सुरूच राहणार असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, अमरावती शाखेचे सरचिटणीस डी. एस. पवार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. आज सकाळी डी. एस. पवार यांच्या नेतृत्वात येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये निदर्शने करण्यात आली. संपात सहभागी असलेल्या विविध खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी उद्या, गुरुवारीही अशीच एकजूट कायम ठेवून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
