वाल्मीक कराड गँगचा तुरुंगातही उच्छाद:संतोष देशमुखांचा मारेकरी सुदर्शन घुलेने कैद्याला केली मारहाण; ऑडिओ क्लिप व्हायरल
![]()
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व त्याचा सहकारी प्रतीक घुले या दोघांनी बीड जिल्हा कारागृहात एका कैद्याला जबर मारहाण केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या घटनेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पीडित व्यक्ती या दोघांच्या मारहाणीमुळे आपले वरचे हाड बाहेर आल्याचा दावा करताना ऐकू येत आहे. या घटनेमुळे वाल्मीक कराड गँगची तुरुंगातही मोठी दहशत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजहर अब्दुल रहमान पठाण असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप नामक अन्य एका कैद्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, या कैद्यांत जेलमधील बराकीतील बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यातून सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप या तिघांनी अजहर पठाणला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर कैद्यांत शाब्दिक चकमक झाल्याचीही माहिती आहे. स्वतः पीडित कैद्याने आपल्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली आहे. त्यांच्यातील फोन कॉलची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. दिव्य मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही. काय आहे व्हायरल क्लिपमध्ये? अजहर पठाण व्हायरल क्लिपमध्ये सांगतो, तुरुंगातील पोलिस माझे ऐकत नाहीत. ते त्यांच्याशी मिळाले आहेत. त्यांनी पैसे घेतलेत. त्यामुळे ते मला न्याय देत नाहीत. मी जेलरला सांगितले. पण तो ही त्यांचाच माणूस आहे. पहिला जेलर चांगला होता. त्याची यांनीच बदली केली. चांदणे साहेबांना सुपरिटेंडेंट यांनीच केले. ते माझे ऐकत नाहीत. उलट मलाच धमक्या देत आहेत. तुझी जेल बदली करू असे सांगत आहेत. माझ्या घरच्या लोकांना फोन करून धमक्याही देत आहेत. आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही. तुझा संतोष देशमुख करून टाकील असे म्हणत आहेत. मी कोर्टाला सांगेल म्हटले तर कुणालाही सांग, आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही असे सांगत आहेत. मला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. त्यांनी मला कितीतरी मारहाण केली. पण त्यानंतरही मला दवाखान्यात नेण्यात आले नाही. जेलर व सगळे कर्मचारी त्यांना मिळालेत. मला न्याय द्या. मला जागेवरून उठ म्हणून मारहाण केली. आम्ही 6 नंबरच्या बराकीत आहोत. तिथे त्यांची खूप दहशत आहे. ते तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही धमक्या देतात. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचीही धमकी दिली, असे अजहर पठाण व्हायरल क्लिपमध्ये सांगताना ऐकू येत आहे. कारागृह अधीक्षकांचे कानावर हात दुसरीकडे, या प्रकरणी कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांना छेडले असता त्यांनी कारागृहात काही कैद्यांत बाचाबाची झाल्याचे मान्य केले. तुरुंगात काही कैद्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हे सर्व कैदी 6 नंबरच्या बराकीत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या प्रकरणी दोन्ही कैद्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली नाही. त्यांनी तसे लेखी दिले आहे. पण मारहाणीसारखा कोणताही प्रकार तुरुंगात घडला नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेची कठोर कारवाईची मागणी दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. विशेषतः सुदर्शन घुले व संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपींना इतर तुरुंगात हलवण्यात यावे. त्यांचे तुरुंगातही जंगलराज सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणालेत.
