विधान परिषदेची रणधुमाळी:भाजपमध्ये अनेक जण इच्छुक; आयारामांना विरोध; 'वर्षा'वर फडणवीसांनी घेतली नेत्यांची बैठक
![]()
राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय गणितांना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसत असले, तरी उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, तर त्यानंतर आता ‘वर्षा’ निवासस्थानी पुन्हा एकदा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी होणार असून 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. विधान परिषदेच्या एका जागेसाठी साधारण २८ ते २९ मतांची आवश्यकता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. यामध्ये भाजपला ५ जागा, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ जागा येणार आहे. भाजपचे पाच उमेदवार निश्चित निवडून येणार असल्याने पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मात्र, भाजपमधील जुने नेते इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यास विरोध करत असल्याचे समजते. या संपूर्ण घडामोडींबाबत आज रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळपर्यंत मोठे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ
मविआमध्ये एका जागेसाठी संघर्ष दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक मोठी कसोटी ठरणार आहे. मविआतील कोणत्याही पक्षाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याइतपत मते नाहीत. त्यामुळे एकमेकांच्या मदतीशिवाय मविआचा उमेदवार जिंकणे अशक्य आहे. सद्यस्थितीत, उपलब्ध एका जागेसाठी श आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरणार कळीची? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही अतिरिक्त मते आहेत. जर महायुतीने पाचव्या जागेव्यतिरिक्त अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावर ‘फोडाफोडी’चे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारी अर्जासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, महायुती आणि मविआकडून उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची दाट शक्यता आहे.
