हिंगोली शहरात हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 511 जणांना 5 लाख 11 हजार रुपयांचा दंड, पोलिस व आरटीओची कारवाई

0
new-project-2026-04-22t201012586_1776868860.jpg




हिंगोली जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून पहिल्याच दिवशी बुधवारी तारीख 22 दिवसभरात 511 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांची अपघात होत असून हेल्मेट नसल्यामुळे अनेकांना प्राण गमविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन व उपप्रादेश परिवहन कार्यालयाने जनजागृती कार्यक्रम घेऊन हेल्मेट सक्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी पारस्कर, गजानन राठोड तसेच महिला कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच दुचाकी वाहन चालकांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यासोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटर वाहन निरीक्षक यांच्या पथकाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या दोन्ही कार्यालयांच्या पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेत पहिल्याच दिवशी 511 दुचाकी वाहन चालकांवर हेल्मेट नसल्यामुळे प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे पाच लाख 11 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने 403 वाहन चालकांवर कारवाई केली तर वाहतूक शाखेने 108 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी तब्बल 511 जणांना दंड लागल्यामुळे हिंगोली शहरात दुचाकी चालकांमधून हेल्मेटची मागणी वाढली आहे. दंड टाळण्यासाठी अनेकांनी हेल्मेट खरेदी करणे पसंत केले दिवसभरात हेल्मेट विक्रीच्या दुकानातून किमान 200 पेक्षा अधिक हेल्मेट विक्री झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापुढे ही मोहीम आणखी गतिमान केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाहनांसोबत कागदपत्रे बाळगावीत : शरद मरे पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहेच याशिवाय वाहन चालवताना वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed