सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस:मी पाणी सोडायला विरोध करताय हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा- शशिकांत शिंदे

0
new-project-2026-04-22t120143966_1776839476.jpg




सातारा जिल्ह्यातील धरणांची घटती पाणी साठवण क्षमता, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी आमदारांवर आणि सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे, असा गंभीर आरोप त्यांनी बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. शशिकांत शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील धरणांमध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली आहे. अशा परिस्थितीत नवीन धरणे बांधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या धरणांतील गाळ काढल्यास नैसर्गिकरित्या पाणी पातळी वाढू शकते. मात्र, सरकार या तांत्रिक बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला. शशिकांत शिंदे पाणी सोडायला विरोध करत आहेत हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा आहे. स्वतःचे तांत्रिक अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या लोकप्रतिनिधीवर आरोप करणे ही पळवाट आहे. निधी वळवल्याने टंचाई जिल्ह्यातील पाणी बंधारे आणि कालव्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, दुरुस्तीसाठी वारंवार निधीची मागणी करूनही सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचा निधी मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवल्यामुळे सातारा जिल्ह्याला या टंचाईचा सामना करावा लागत असावा. पुसेगाव पट्ट्यातील जनतेला फसवून दोन भागांत संघर्षाची ठिणगी टाकण्याचे ‘पाप’ सत्ताधाऱ्यांनी केले आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे नियोजन प्रशासनाला जमलेले नाही. जनतेची फसवणूक सुरू शशिकांत शिंदे म्हणाले की, गेली 20 वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा कमी करून तो दुसरीकडे वळवणे हा चुकीचा निर्णय आहे. पाणी द्यायला आमचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. परंतु, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेली आश्वासने आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने चाललेला सावळा गोंधळ यामुळे जनतेची फसवणूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed