![]()
पुणे लोहमार्ग पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी त्याने प्रवाशांचे सिमकार्ड चोरून लाखोंची फसवणूक केली होती. आरोपी संकेत सतीश कुलकर्णी (वय २३, रा. आकुर्डी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यांपैकी एक घटना सांगली येथील विनोद सदाशिव रेणुके (वय ४७) यांच्यासोबत घडली. पुणे रेल्वे स्टेशनच्या स्लीपर वेटिंग रूममध्ये त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. काही वेळाने त्यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेणुके यांनी नवीन सिमकार्ड घेतल्यानंतर त्यांना धक्कादायक संदेश प्राप्त झाले. त्यांच्या नावावर ऑनलाईन कर्ज घेऊन १ लाख १३ हजार रुपयांचे महागडे मोबाईल फ्लिपकार्टवरून खरेदी करण्यात आले होते. तसेच, त्यांच्या बँक खात्यातून ४,५०० रुपयांचे व्यवहारही झाले होते. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला वेटिंग रूममधील सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळे आले. आरोपी सतत सिमकार्ड बदलत असल्याने तांत्रिक तपासही गुंतागुंतीचा ठरला. मात्र, रेल्वे स्टेशनच्या स्लीपर वेटिंग रूम क्रमांक २ मध्ये अशीच दुसरी घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्म परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. यामध्ये संशयित आरोपीचे फुटेज हाती लागल्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचला. अखेर, ११ दिवसांच्या पाठलागानंतर आरोपी संकेत कुलकर्णीला आकुर्डीतून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच संकेतने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैशांची गरज असल्याने तो प्रवाशांचे सिमकार्ड चोरायचा. त्यानंतर ते सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून पीडित व्यक्तीचे जीमेल अकाउंट सुरू करायचा. गुगल फोटोजमध्ये जाऊन तो पीडितांच्या आधार कार्ड किंवा डेबिट कार्डचे फोटो मिळवत असे. या माहितीच्या आधारे तो फोन पे किंवा पेटीएमचा यूपीआय पिन बदलून बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारत असे. त्याने अशा प्रकारे तीन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तू आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. सदरची कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक शंभू रणवरे, साळुंखे आणि आरपीएफच्या पथकाने केली आहे.
मोबाईल चार्जिंगला लावलेल्या प्रवाशांचे सिमकार्ड चोरी:लाखोंचा गंडा घालणारा उच्चशिक्षित तरुण संकेत कुलकर्णी अटकेत
