
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे फारच क्वचित प्रसंगी मातोश्रीवर गेले होते. मात्र, आज ते कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक बंधन न ठेवता स्वखुशीने उद्धव ठाकरेंना वाढद
.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी साडे अकरा वाजता दादर येथील आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानातून मातोश्रीकडे रवाना झाले आणि साधारणतः बारा वाजता ते मातोश्रीवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी खास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत स्वतः बाहेर आले होते. राज ठाकरे यांचे स्वागत करताना दोघांच्याही चेहऱ्यावर सौहार्दपूर्ण स्मितहास्य झळकत होते.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना आपल्या सोबत घेऊन मातोश्रीबाहेर उभारलेल्या व्यासपीठावर आणले. तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी एकत्र फोटोसेशन केले. यावेळी त्यांच्यातील भावनिक स्नेह स्पष्टपणे जाणवत होता. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना काही वेळ थांबण्याची विनंती केली आणि मग ते राज ठाकरे यांना घेऊन घरात गेले.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. मातोश्रीबाहेर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले असून, आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
याआधी अमितच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर
राज ठाकरे यांचे मातोश्रीवर आगमन हे अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यापासून त्यांनी मातोश्रीला भेट देण्याचे प्रसंग अत्यंत मर्यादित ठेवले होते. जेव्हा कधी ते गेले, तेव्हा कोणतेतरी विशेष, अपरिहार्य कारणच त्यामागे होते. यापूर्वी ते अमित ठाकरेंच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच पूर्णपणे स्वेच्छेने मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे ही भेट केवळ एक साधा स्नेहविनिमय नसून, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची नांदी ठरू शकते, अशी चर्चा सध्या रंगत आहे.
आजच्या भेटीने दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना बळ
अलीकडेच पार पडलेल्या मराठी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये आलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. परंतु त्यानंतर कोणतीही ठोस युतीसदृष चर्चा झाली नाही. त्यामुळे मनसे-ठाकरे गटाची युती बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले असल्याने, दोन्ही बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याची शक्यता पुन्हा बळावली आहे.
विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती झाल्यास ती सत्ताधारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे राज ठाकरे यांची मातोश्री भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरेल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.