60 फूट खोल विहिरीतून गायीला सुखरूप बाहेर काढले:मोर्शीजवळ 'वारसा' संस्थेच्या प्रयत्नांमुळे मिळाले जीवदान
![]()
मोर्शी प्रतिनिधी: मोर्शीजवळील दापोरी गावात ६० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका गायीला ‘वारसा’ संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप बाहेर काढले. संस्थेच्या तत्परतेमुळे गायीला जीवदान मिळाले असून, या यशस्वी बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना दापोरी गावात घडली. गाय ६० फूट खोल विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ‘वारसा’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाष व्यवहारे आपल्या रेस्क्यू किटसह घटनास्थळी पोहोचले. विहिरीची गोलाई कमी असल्याने आणि गाय शरीराने मोठी असल्याने ती खोलवर फसली होती. विहिरीच्या आत काहीही दिसत नसल्याने टॉर्च आणि बॅटरीच्या साहाय्याने आधी खात्री करण्यात आली. त्यानंतर ‘वारसा’ संस्थेच्या बचाव पथकातील एका कार्यकर्त्याला विहिरीत उतरवण्यात आले. इतर सहकाऱ्यांनी आवश्यक साहित्य खाली सोडले. गायीला दोराच्या साहाय्याने कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बांधण्यात आले. जेसीबी आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर गायीला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. ६० फूट खोल विहिरीत पडूनही गायीला मार लागला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या गायीला मोर्शी येथील गोरक्षणमध्ये चारापाण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या बचावकार्यासाठी जीवन होले, निलेश खोडकर, अमोल धानोरकर, बाबूभाऊ अंधारे, सुनील वानखडे, गजानन दाणे, प्रफुल फलके, अक्षय कडू, विजय करडे, स्वप्नील ढोमणे, ज्ञानेश्वर गेडाम, वृषभ कडू, गोपाल अंधारे, प्रफुल राऊत, अंकुश कोल्हे, गोपी बडोरे, भूषण चौधरी, हरिश कोल्हे, ज्ञानेश्वर डाखोरे, सागर पोटपिटे, यश गोळे, प्रणव वानखडे, विनीत नांदूरकर, नितीन चिखले आणि हर्षल गलफट यांसह अनेक गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
