राळेगावच्या बेपत्ता 34 मुलींचे गूढ कायम:कुरेशी दाम्पत्याचा घटनेशी संबंध नाही, धर्मांतर अन् शोषणाचीही तक्रार नाही – SP कुमार चिंता

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-20t15_1776680185.png




यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हिंदुत्वादी संघटनांनी आज राळेगाव बंदची हाक दिली आहे. यामुळे वातावरण तंग झाले असताना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणातील संशयित कुरेशी दाम्पत्याचा या घटनांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषतः या प्रकरणी अद्याप धर्मांतर व शोषणाची तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, गायब झालेल्या मुलींविषयी कुरेश दाम्पत्याचा अद्याप कोणताही सहभाग आढळला नाही. तसेच शोषणाची तक्रारही दाखल झाली नाही. पण बालविवाहाच्या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मजहर कुरेशी नामक व्यक्तीविरोधात घरात तलवार आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरेशी दाम्पत्याचे केवळ लग्न जुळवण्याचे काम पोलिस अधीक्षक या प्रकरणाची अधिक माहिती देताना म्हणाले, राळेगावात एक बालविवाह होणार होता. त्यात मुलगी 15 वर्षांची, तर मुलगा 44 वर्षांचा होता. हे सर्व आदिवासी समाजाचे होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पूर्णतः वेगळे होते. पण नंतर त्याची सरमिसळ झाली. राळेगावातील कल्याणी कुरेशी व तिचा पती मजहर कुरेशी नामक दाम्पत्य राहते. हे नवरा-बायको लग्न जुळवण्याचे काम करतात. त्यांनी आदिवासी मुलींचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात अजून काही आढळले नाही. पण त्यांनी इतर समाजाच्या मुलींची लग्ने जुळवली आहेत. या दाम्पत्याच्या मध्यस्थीने चंद्रपूर, नागपूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर येथील मुलींचे लग्ने झाली आहेत. पण हे प्रकरण वेगळे आहे. त्यात अद्याप धर्मांतर किंवा शोषणाची तक्रार दाखल झाली नाही. ते पुढे म्हणाले, संशयित मजहर कुरेशीची पत्नी हिंदू आहे. पण त्यातही धर्मांतराचा प्रकार कुठे समोर आला नाही. असे असले तरी गायब 34 मुलींच्या प्रकरणाचा विस्तृत तपास केला जाईल. या प्रकरणी संशयितांचा आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्डही तपासला जाईल. मजहरच्या घराची झडती घेतली असता तिथे तलवार आढळली. त्यामुळे त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण शोषणाची तक्रार अद्याप समोर आली नाही. तशी एखादी तक्रार आली तर पोलिस तत्काळ कारवाई करतील, असे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्पष्ट केले. बेपत्ता मुलींविषयी अद्याप तक्रार नाही ते पुढे म्हणाले, काही संघटना व महिलांकडून मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. रेकॉर्डवर तपास केल्यानंतर 2025 मध्ये 38 मुली बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 37 मुलींचा शोध घेण्यात यश आले. 2025 मध्ये 14 मुलींचे अपहरण झाले होते. त्यातील 12 मुलींना शोधण्यात यश आले. इतर 2 प्रकरणे तपासात निकाली निघाले आहेत. 2026 मध्ये 9 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील 8 जणींचा शोध लागला आहे. आता गायब असलेल्या 34 मुलींविषयी पोलिस ठाण्यात एकही तक्रार दाखल नाही. त्यांच्या नावांचीही माहिती समोर आली नाही. त्यानंतरही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस योग्य तो तपास करतील. त्यात काही ठोस निष्पन्न झाल्यास कारवाई होईल. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही, असेही कुमार चिंता यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks