पुणे मनपातील टक्केवारी वादावरून आम आदमी पक्ष आक्रमक:भ्रष्टाचारमुक्तीसाठी जन आंदोलन सुरू करण्याचा दिला इशारा
![]()
पुणे महानगरपालिकेत विकासकामांच्या टक्केवारीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) आक्रमक झाली आहे. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या बिलाच्या टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये झालेल्या भांडणामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविरोधात ‘आप’ने भ्रष्टाचारमुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणारी विकासकामे अधिकारी आणि नगरसेवकांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप आहे. निकृष्ट कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांची खंडणी आणि टक्केवारी आजी-माजी नगरसेवकांना द्यावी लागत असल्याचे समोर आले आहे. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या तीन कोटी रुपयांच्या बिलाच्या टक्केवारीवरून सत्ताधारी भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांमध्ये जोरदार भांडणे झाली. या घटनेने पालिकेच्या विकासकामांमध्ये कामाच्या दर्जापेक्षा टक्केवारी किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा उघडकीस आले. टक्केवारीचे कुरण बनलेल्या पुणे पालिकेच्या विरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, टक्केवारीला पायबंद घालण्यासाठी पालिका भवनात भ्रष्टाचारमुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात ‘आप’चे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले. ‘आप’चे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले की, समाजसुधारक महात्मा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत पालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लढा दिला होता. स्वातंत्र्यसेनानी गणपतराव नलावडे, ज्येष्ठ विचारवंत एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब पुरुळेकर, बाबुराव सणस, नामदेवराव मते, भाई वैद्य आदींच्या निस्वार्थी व त्यागी नेतृत्वामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली. मात्र, अलिकडच्या काळात पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडत चालला आहे. बेनकर पुढे म्हणाले की, पालिकेच्या मुख्यालयातच भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे व विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांचे कामाच्या टक्केवारीवरून जोरदार भांडण झाले. शहर आणि जनतेच्या विकासाऐवजी स्वतःला टक्केवारी मिळावी यासाठी आजी-माजी नगरसेविका अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भांडण करतात, यामुळे पुणेकरांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या घटनेचा आम आदमी पार्टी आणि पुणेकरांच्या वतीने तीव्र निषेध करतो. शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी मागणी केली की, या प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर यावे, ताबडतोब चौकशी समिती स्थापन करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणाची प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांत तात्काळ दखल घ्यावी. विषय प्रचंड गंभीर असून, अन्यथा पुणेकरांच्या भ्रष्टाचारमुक्तीसाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून जन आंदोलन सुरू करणार आहे.
