संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या:छळामुळे आत्महत्या केल्याचे उघड; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0
14518100-0cf7-4ffa-8e28-0955279d2f93_1776609077055.jpg




वाघोली परिसरात छळाला कंटाळून एका संगणक अभियंता महिलेसह दोन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका प्रकरणात संगणक अभियंता महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत, वाघोली येथे एका ३७ वर्षीय संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केली. तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तिचा पती अभिषेक गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. या प्रकरणात सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधातही आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी आहेत. फिर्यादीनुसार, आरोपी पतीने संगणक अभियंता महिलेकडे १० लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने वाघोलीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात २१ वर्षीय विवाहित तरुणी प्रतीक्षा जयसिंग कदम हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती जयसिंग मधुकर कदम (वय २९) याला अटक करण्यात आली असून, सासू हौसाबाई (वय ५५) हिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पतीने प्रतीक्षाकडे माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली होती. तसेच, मोटारीचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करून तिचा छळ करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks