'नोटसम्राट 2' पुस्तकाचे प्रकाशन:नोटबंदीच्या लढ्यावर आधारित, मोदींच्या निर्णयांचे समर्थन

0
e7eef5d1-5e7f-4904-8b15-c548dd928614_1776596267887.jpg




प्रा. विनायक आंबेकर लिखित ‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या हस्ते ‘अग्निपंख प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि लेखक प्रा. आंबेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना केशव उपाध्ये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पंतप्रधानांना देशातील प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास केल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सखोल जाणीव आहे. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांच्या योजना आणि विकासकामांमागील मुख्य भूमिका होती. उपाध्ये यांनी पुढे नमूद केले की, जनहिताचे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी कधीही कचरले नाहीत. त्यांच्या दूरदृष्टीच्या भूमिकेमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. विरोधकांनी मात्र केवळ राजकीय विरोधासाठी मोदीजींना विरोध केला, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध होत असून, गेल्या बारा वर्षांत घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम समाज अनुभवत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अभय कुलकर्णी यांनी माहितीच्या युद्धावर भाष्य केले. ते म्हणाले की, विषय तज्ज्ञांनी त्यांची तांत्रिक माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिणे आवश्यक आहे. सध्या माहितीचे युद्ध हे कुठल्याही देशाच्या थेट आक्रमणापेक्षा गंभीर आहे. डिजिटल माध्यमांमध्ये पाश्चिमात्य देशांकडून अधिक आशय निर्मिती होते, तर आपल्याकडून मर्यादित प्रमाणात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात डिजिटल माध्यमांमध्ये वेगाने आशय निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुस्तकाचे लेखक प्रा. विनायक आंबेकर यांनी नोटबंदीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात 1996 पर्यंत बनावट नोटांची समस्या नव्हती. त्यानंतर प्रथमच भारताच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या आणि तेव्हापासून बनावट नोटांचा प्रश्न सुरू झाला. आंबेकर यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून भारतात पाठवायला सुरुवात केली. 2004 ते 2014 या काळात देशांतर्गत झालेल्या 500 अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे हे पैसे वापरले गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना स्वेच्छेने नव्हे, तर अनिवार्यता म्हणून नोटबंदी करावी लागली. हे पुस्तक ही सर्व माहिती रंजक पद्धतीने कथानकाच्या स्वरूपात मांडते.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks