लातूर हादरले!:दोन भाऊ बेपत्ता, घरापासून 60 फुटांवर चिमुकल्याचा मृतदेह; दुसरा अद्याप बेपत्ता

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-19t185535482_1776605109.jpg




लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात दोन सख्खे चुलत भाऊ घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, यातील 6 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराच्या अवघ्या 60 फुटांवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वामी कुटुंबातील देवांश (6 वर्षे) आणि साईचरण (11 वर्षे) हे दोघेही बेपत्ता झाले होते, ज्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. शोधमोहीम सुरू असतानाच देवांशचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला, मात्र 11 वर्षांचा साईचरण अद्यापही बेपत्ता असून पोलिस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. 11 वर्षीय साईचरण दिनेश स्वामी हा अद्याप बेपत्ता असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही मुले बेपत्ता होण्यामागचे नेमके कारण काय आणि 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू हा घातपात आहे की अपघात, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलिस तपासातूनच यावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट टीम, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली असून, या घटनेमागील गूढ उकलण्यासाठी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास दहा पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks