नागपूरच्या कामठीत सिलिंडरचा स्फोट:40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू तर 10 जखमी; गॅस गळतीमुळे लागली आग

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-19t172025461_1776599398.jpg




नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंदी परिसरात सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानतावणे कुटुंब सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. त्यानंतर काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण घरात आग पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागल्यानंतर पत्नी व मुले घराबाहेर पाडण्यात यशस्वी झाले. मात्र अतुल हे बेडरूममध्येच अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. घरात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काहीजणांनी प्रयत्न केले. यात ते देखील जखमी झाले. या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असली तरी तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, या घटनेचा पुढील सखोल तपास सुरू आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks