दगडूशेठ गणपतीला अक्षय्यतृतीयेनिमित्त 11 हजार आंब्यांचा महाभोग:भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या
![]()
अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा महानैवेद्य अर्पण केला. या मंगलदिनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रविवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे 4 वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी 8 वाजता गणेशयागही संपन्न झाला. अर्पण करण्यात आलेला आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, तसेच वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्थांना वाटण्यात येणार आहे. याशिवाय, मंदिरात उपस्थित भाविकांनाही हा प्रसाद दिला जाईल. अक्षय तृतीयेनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल – छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (19 एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले
