मोदी है तो मुमकिन है आता दंतकथा, फक्त 'नमकीन'भाषणे उरली!:850 जागा करून सत्तेचा अमर पट्टा बांधण्याचा डाव उधळला- संजय राऊत
![]()
मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे बहुमत नसताना हे भोंदू बिल लोकसभेत आणले, त्यांचा मुळ उद्देश 543 जागा वाढवून 850 करायच्या आणि सत्तेचा अमर पट्टा बांधत सतत विजय मिळवण्यासाठी हे बिल होते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भविष्यात बेकायदेशीरपणे विजय मिळवता यावे यासाठी 850 जागा महिलांच्या नावाने वाढवायचा हा हेतू होता. सत्ताधाऱ्यांना देशात वाद पेटवायचा होता. 2023 मध्ये मंजूर केलेल्या बिलाला 543 मध्येच 33 टक्के आरक्षण देण्यास आम्ही पाठिंबा दिला होता. पण केवळ सत्तेतील खासदारांच्या सीट वाचवण्यासाठी हे बिल आणले होते ते आम्ही उधळून लावले. या विधेयकानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी VS अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला. पहिले ही चर्चा दबक्या आवजात सुरू होती. पण आता लोकसभेच्या पटलावर दिसून आले. महिला आरक्षण विधेयक पडलेले नाही ते 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. 16 महिन्यामध्ये 16 नंबर मोदींना घरी बसवेल असा दावाही राऊतांनी केला आहे. भाजप हा भोंदू पक्ष संजय राऊत म्हणाले की, आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, कुणीच केला नाही. कारण 2023 मध्ये हे महिला आरक्षणाचे बिल पास झाले आहे. भाजप हा पक्ष भोंदू आहे, त्यांनी देशात आणि राज्यात अनेक भोंदू तयार केले आहेत, ते भोंदू प्रकारचे विचार आणतात. भविष्यातील राजकारणात 16 आकडा धोक्याचा आहे. तेव्हा अमृता फडणवीस गप्प का बसल्या? संजय राऊत म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बॅकेत जर असे प्रकरण घडले असेल तर तेव्हा शांत का बसल्या? त्यांनी तक्रार दाखल का केली नाही. त्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या पत्नी आहेत, त्या शांत का बसल्या असा प्रश्न जनता विचारू शकते, असे राऊतांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हटले आहे. हे जनतेचे यश संजय राऊत म्हणाले की, काल विधेयक मंजूर झाले नाही हे काही विरोधी पक्षाचे यश नाही हे जनतेचे यश आहे. हा देशातील महिलांचा विजय आहे. महिलेच्या नावाने जी फसवणूक सुरू होती आम्ही त्या विरोधात मतदान केले. आम्ही काही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, पण हे बिल 2023 मध्येच मंजूर झाले, आता जे खासदार आहेत. त्यापैकी 33 टक्के जागा राखीव कराव्या. देशातील महिला आमच्यासोबत आहे. महिलांना पैसे देऊन त्यांचे मत विकत घेतात. ते पैसे देणं बंद करा मग महिला कोणासोबत आहे ते तुम्हाला समजेल.
