Thalapathy Vijay | महिलांना दरमहा २५०० रुपये आणि ८ ग्रॅम सोनं; थलपती विजयने जाहीर केलं घोषणापत्र
Thalapathy Vijay | तमिळनाडू (Tamil Nadu) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता ते राजकारणी बनलेले थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी त्यांच्या तमिळगा वेट्री कझगम (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षाचे घोषणापत्र जाहीर केले. या जाहीरनाम्यात महिलांसाठी आर्थिक मदत, तरुणांसाठी रोजगार आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. (Tamil Nadu elections 2026)
टीव्हीकेच्या घोषणापत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. गृहिणींना दरमहा 2500 रुपयांची थेट आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच गरीब कुटुंबातील नवविवाहित महिलांना 8 ग्रॅम सोनं आणि रेशमी साडी देण्याची योजना मांडण्यात आली आहे. महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याज कर्ज देण्याचाही प्रस्ताव आहे. (Thalapathy Vijay manifesto)
घरगुती खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दरमहा 200 युनिट मोफत वीज देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्षातून 6 गॅस सिलिंडर मोफत देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुलभ करण्यासाठी पाइपलाइन सुविधा देण्यावरही भर देण्यात आला आहे. या योजनांमुळे सामान्य कुटुंबांचा आर्थिक ताण कमी होईल, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
Thalapathy Vijay | तरुण, शेतकरी आणि समाजासाठी मोठी घोषणाबाजी :
तरुणांसाठी रोजगार आणि शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बेरोजगार पदवीधरांना दरमहा 4000 रुपये आणि डिप्लोमा धारकांना 2500 रुपये भत्ता दिला जाईल. इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5000 ते 8000 रुपयांपर्यंत स्टायपेंड देण्याची तरतूद आहे. पाच लाख तरुणांना 18000 रुपयांच्या रोजगार सहाय्य योजनेत सामावून घेण्याचा मानस आहे.
शेतकरी, मच्छिमार आणि कामगारांसाठीही विविध सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत. पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के कर्जमाफी दिली जाईल. मच्छिमारांसाठी किमान दर, बंदरकाळात आर्थिक मदत आणि विमा कवच देण्यात येईल. वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. तसेच राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढवून ‘नशामुक्त तमिळनाडू’ अभियान राबवण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.
