![]()
महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर होणार आहे. या यात्रेचा शुभारंभ २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात होईल, अशी माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ही यात्रा सलग १५ दिवस चालणार असून, यामध्ये सुमारे ६,००० किलोमीटरचा प्रवास केला जाईल. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे संचालन होईल, ज्यात १,००० हून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या प्रवासादरम्यान १५,००० पेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल. या यात्रेचा मुख्य उद्देश देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे, जेणेकरून रासायनिक शेतीला सक्षम पर्याय मिळेल. गोशाळांना देणग्यांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. तसेच, शेण आणि गोमूत्रापासून तयार होणारी सेंद्रिय खते, औषधे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांविषयी जनजागृती केली जाईल. पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोगाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, गोशाळा व पशुसंवर्धन विभागात समन्वय राखणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोखा निर्माण करणे हे देखील या यात्रेचे उद्दिष्ट आहे. या ऐतिहासिक संवाद यात्रेचा सांगता सोहळा ५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारोप कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्री, देशभरातील गोसेवक आणि गोशाळा संचालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. नुकतेच या संवाद यात्रेच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हे अनावरण झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील, डॉ. शैलेश केंढे, डॉ. देवेंद्र जाधव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
देशी गोवंश रक्षणासाठी 22 जूनपासून 'गोमाता संवाद यात्रा':महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाचे संयुक्तपणे आयोजन
