[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उम्सानगर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३० लाख १६ हजार ६१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास उम्सानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारतळा ते नायगाव जाणाऱ्या रस्त्यावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वाका फाटा परिसरात नाकाबंदी करून MH-17 BY-2685 क्रमांकाचा भारत बेंझ कंपनीचा हायवा थांबवून तपासणी केली.
वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ५ ब्रास रेती आढळून आली. रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी व कागदपत्रांबाबत चौकशी केली असता संबंधितांकडे आवश्यक परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करून रेतीची अंदाजे किंमत १६ हजार ६१० रुपये, तर हायवा वाहनाची किंमत सुमारे ३० लाख रुपये, असा एकूण ३० लाख १६ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चालक शिवाजी जाधव (वय २४, व्यवसाय चालक, रा. उमरा, ता. लोहा) याच्याविरुद्ध उम्सानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच खान व खनिज अधिनियमातील कलम ४ व २१ अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उम्सानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश मुळीक, पोलीस अंमलदार साईनाथ मोरे व होमगार्ड यांच्या पथकाने केली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.
Post Views: 393
[ads2]
















Leave a Reply