हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा:पुणे महापालिका निरीक्षकाला मारहाण, गाडीची काच फोडली, भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल
![]()
हडपसरमधील हांडेवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत निरीक्षकाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (16 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू होती. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईला विरोध करत सहायक निरीक्षक अमोल लावंड यांना धमकावले. विक्रेत्यांनी लावंड यांच्यावर महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर अतिक्रमण कारवाईस विरोध करत एकाने लावंड यांच्या गाडीची काच फोडली. या घटनेबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड आणि सोनू सुदेश रोकडे (सर्व रा. हांडेवाडी) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत आहेत. किरकोळ वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. क्रिश सुरेंद्रसिंग (वय 20, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल चंद्रकांत घोरपडे (वय 36, रा. लक्ष्मी निवास, देशमुखवाडी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे यांचा सरबत विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी वैमनस्यातून क्रिश याला शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. क्रिश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
