बंडगार्डन पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार:उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; राहुल डंबाळे उच्च न्यायालयात धाव घेणार
![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ससून रुग्णालयाच्या ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा वापर करून ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात बंडगार्डन पोलिस अपयशी ठरले आहेत. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, ८० तासांनंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. या दुर्लक्षाविरोधात सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. राहुल डंबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय परिसरात झालेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत त्यांनी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांची भेट घेतली होती. यावेळी शिविणकर यांनी बंडगार्डन पोलिस निरीक्षकांना यापूर्वीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असूनही स्थानिक पोलिस प्रशासनाने या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप डंबाळे यांनी केला आहे. १२ एप्रिलपासून या आवाजाच्या मर्यादेबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. ८० तासांहून अधिक काळ उलटूनही बंडगार्डन पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. डंबाळे यांनी म्हटले आहे की, “एकीकडे भीमसेवा प्रतिष्ठानने शांततेत अभिवादन करण्याचा आदर्श जपला, तर दुसरीकडे पोलिस प्रशासन कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.” बंडगार्डन पोलिसांच्या या निष्क्रियतेची आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याची गंभीर दखल घेत, राहुल डंबाळे यांनी आता न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली जाणार आहे. यामध्ये दोषी मंडळांसोबतच, ८० तास उलटूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
