निदा खानचा पोलिसांना चकवा; धर्मांतर कटाची सूत्रधार फरार:गर्भवती असल्याच्या दाव्याने खळबळ; जामीनावर उद्या सुनावणी
![]()
नाशिकमधील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिच्याबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. 21 दिवसांपासून फरार असलेली निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात खळबळ उडाली असताना, आता ती गर्भवती असल्याचा दावा समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानने नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक पोलिसांनी निदा खानच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त केली असून, तिचा माग काढण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू आहे. ती वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे तिला अटक करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. तिच्या हालचालींवर तांत्रिक माध्यमांतून लक्ष ठेवले जात असून, लवकरच तिचा शोध लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता, पोलिसांकडून कोणतीही ढिलाई न ठेवता तपास सुरू आहे. या प्रकरणात निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना लक्ष्य करून त्यांचे ब्रेनवॉश करणे, तसेच त्यांच्यावर धर्मांतरासाठी मानसिक दबाव टाकणे, असे प्रकार तिच्या माध्यमातून घडत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेमागे एक ठराविक पद्धत वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या ‘मोडस ऑपरेंडी’मुळे नाशिकसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात निदा खानची अटक झाल्यास अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहणारी निदा खान ही या सर्व कारवायांची प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. नवीन येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांना जाळ्यात ओढण्याचे काम तिच्या मार्फत केले जात होते. तसेच मीटिंगदरम्यान तरुणींवर मानसिक छळवणूक करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या सर्व कारवायांमध्ये ती ‘ऑपरेशन डिपार्टमेंट’सारखी भूमिका बजावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काही आरोपींना अटक केली आहे. कंपनीतील एचआर प्रमुख अश्विनी चैनाणी हिला अटक करून तिची चौकशी करण्यात आली असता, निदा खानच या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहारही झाल्याचा संशय असून, आरोपींना आवश्यक ते आर्थिक सहाय्य देखील पुरवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार अधिक मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचा तपास वेगाने दरम्यान, निदा खान ही मूळची नाशिकच्या द्वारका परिसरातील रहिवासी असून, 2021 पासून ती संबंधित कंपनीत कार्यरत होती. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी निदा खान बाहेरून सामान्य जीवन जगत असल्याचे चित्र होते. तिचे लग्न एजाज खान यांच्यासोबत झाले असून तिचे कुटुंबही सामान्य पार्श्वभूमीचे आहे. मात्र, या प्रकरणात तिच्यावर गंभीर आरोप झाल्याने तिच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
