किरकोळ कारणावरून मारहाण:85 हजारांचा मुद्देमाल पळविला, तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
![]()
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याच्या आरोपावरून तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 16 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील रहिवासी बालाजी चव्हाण हे शहरालगत बळसोंड येथे प्लॉटवर कामासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी काम करीत असतांना कृष्णा भोसले, पंकज सोळंके, समीक कांबळे हे तिघेजण त्या ठिकाणी आले. यामध्ये तू एका महिलेस पैसे उधार का दिले या कारणावरून कृष्णा याने बालाजी यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेला. यामध्ये कृष्णा, पंकज व समीक यांनी बालाजी यांना काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे ते प्रतिकार करू शकले नाही. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यावेळी तिघांनी बालाजी यांच्या हातातील चांदीचे 25 तोळे वजनाचे कडे, हाताच्या दोन बोटातील अंगठ्या व खिशात असलेले रोख 20 हजार रुपये असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बालाजी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. या प्रकरणी बालाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कृष्णा भोसले, पंकज सोळंके, समीक कांबळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.
