आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं?:निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर राऊतांचा संताप; महिला आरक्षणावरूनही राऊत आक्रमक
![]()
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यामागे भाजपला कोणतेही कारण नव्हते, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, भाजपचे लोक सध्या तमाशा बघत असतील, पण एक दिवस हेच प्रकरण त्यांच्या अंगावरही येईल. राज्यातील भाजपमधील मराठी नेत्यांनी या सगळ्यावर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच राजकीय हेतूने विरोधकांवर आरोप करण्याची पद्धत चुकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असताना ते तात्काळ लागू करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणुका आल्या की महिलांच्या खात्यात पैसे टाकून मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले. धमक्या देण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, तेव्हाच महिलांचा खरा पाठिंबा कोणाला आहे हे समजेल, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
