एसआयआर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याची मागणी:काँग्रेस, वंचित आघाडीचे नेवासा तहसीलदारांना निवेदन
![]()
देशभरात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संशयास्पद पद्धतीने सुरू असल्याचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि मतदारांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नेवासा तहसीलदार व निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यापूर्वी त्याचे आधारकार्ड, मतदान कार्ड आणि रहिवासी पुराव्यांची सखोल पडताळणी होणे अनिवार्य आहे. नाव वगळल्यास त्याचे स्पष्ट आणि लेखी कारण संबंधित व्यक्तीला द्यावे; ही माहिती केवळ व्हॉट्सॲपवर देऊन चालणार नाही. तसेच, वगळलेल्या नावांची यादी त्या त्या ग्रामपंचायतीला देऊन तो विषय ग्रामसभेत चर्चेसाठी ठेवण्यात यावा. वंचित आघाडीचे पोपटराव सरोदे यांनी इशारा दिला की, “एसआयआर प्रक्रियेत कोणतीही चूक झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यास जबाबदार धरून कठोर कायदेशीर भूमिका घेतली जाईल.” काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी ही प्रक्रिया लोकशाहीचा पाया असल्याचे सांगत जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, वंचितचे संदीप क्षीरसागर, गणपत मोरे, हरीश चक्रनारायण यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
