बच्चू कडूंची एव्हरेस्टवर दमदार झेप:उणे 15 अंशात 5364 मीटरवर पोहोचत इतिहास रचला; राजकारणातून थेट हिमालयात
![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. 13 एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मजल मारत एक नवा विक्रम नोंदवला. 5364 मीटर म्हणजेच 17,594 फूट उंचीवर पोहोचत त्यांनी आपल्या जिद्दीचा आणि चिकाटीचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे, हा प्रवास त्यांनी कोणत्याही विशेष सुविधा न घेता पूर्ण केला. हा संपूर्ण ट्रेक अत्यंत खडतर मानला जातो. सलग आठ दिवस दररोज 12 ते 14 किलोमीटर पायी चालत, डोंगर-दऱ्यांमधून चढाई करत हा प्रवास पार करावा लागतो. जसजसे उंची वाढत जाते, तसतसे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तर फक्त 45 टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो. त्यामुळे श्वास घेणेही कठीण होते. याशिवाय उणे 15 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारी थंडी ही आणखी एक मोठी परीक्षा होती. या कठीण परिस्थितीत बच्चू कडू यांनी आपल्या मुलासोबत हा ट्रेक पूर्ण केला. ‘द अल्पायनिस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून आयोजित या मोहिमेत त्यांना एव्हरेस्टवीर भगवान चवले यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण 14 सहकाऱ्यांसह त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. शेवटच्या दिवशी 17 किलोमीटरचा लांब टप्पा पार करत त्यांनी बेस कॅम्प गाठला. या संपूर्ण मोहिमेत त्यांनी शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी दिली. सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न या मोहिमेला बच्चू कडूंनी एक सामाजिक आणि प्रेरणादायी संदेशही जोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही मोहीम भारताचे संविधान आणि भगवद्गीता यांना समर्पित केली. यामागे देशभक्ती आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा पाहून बच्चू कडूंनी महाराष्ट्रातही अशाच सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. राज्यात साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. जनआंदोलनातून पुढे आलेले लढवय्ये नेते बच्चू कडू यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही, तर जनआंदोलनातून पुढे आलेले लढवय्ये नेते म्हणून आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते म्हणून त्यांनी दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासात आता एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची कामगिरीही जोडली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारे ते कदाचित पहिलेच नेते ठरले असून, त्यांच्या या यशाची राज्यभरात चर्चा रंगली आहे.
