धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:न झालेल्या विहिरीचे पैसे भरण्याचा पोलिसांनी तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप
![]()
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्ायची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. शेतात विहीर नसतांनाही त्यासाठी उचलण्यात आलेले पैसे भरण्याचा तगादा पोलिसांकडून लावल्या जात असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. धनगरवाड येथील गोरख बबन पातळे (२५) यांना धनगरवाडी शिवारात सुमारे अडीच एकर शेत आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटूुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी आई, वडिल, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या शेतात हमी योजने अंतर्गत सिंचन विहीरीचे काम झाले नसतांनाही काही दलालांनी त्यांच्या शेतात विहीरीचे काम झाल्याचे दाखवून २.३४ लाख रुपये उचलण्यात आले आहे. मात्र याचा कानोकान खबरही गोरख यांना नव्हती. दमयान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून सदर रक्कम भरणा करण्याबाबत तगादा लावला जात असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यानंतर आज दुपारी त्यांनी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटूुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने शंका आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहणी केली असता मयत गोरख यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, उपनिरीक्षक राठोड यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र जो पर्यंत पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाहीतो पर्यंत मृतदेह खाली काढणार नाही अशी भुमीका गावकऱ्यांनी घेतली. त्यानंतर क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तिव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी मयत गोरख यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितल्यानंतर रात्री आठ वाजता मृतदेह खाली उतरविण्यात आला. मात्र जो पर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तसेच पैसे भरण्यासाठी दबाव टाकणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबीत केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भुमीका गावकऱ्यांनी घेतली आहे. कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन उभारणार या प्रकरणात पोलिसांकडून विनाकारण निर्दोष शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात सर्वच दोषींवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आंदोलन उभारणार असल्याचे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, नामदेव पतंगे यांनी सांगितले.
