बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
![]()
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास कुटुंब झोपेत असताना, मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि ठार केले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी वाघाचे तीन वेळा हल्ले यापूर्वी साकोली तालुक्यातील बांपेवाडा-उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने तीन हल्ले केले आहेत. १९ मार्च रोजी वसंता मेश्राम यांच्यावर हल्ला झाला होता, तर २८ मार्च रोजी माया सोनवणे यांचा मृत्यू झाला होता. १ एप्रिल रोजी छाया मूंगमोडे गंभीर जखमी झाल्या होत्या. अवघ्या २६ दिवसांत ही चौथी घटना घडली आहे. नरभक्षक ठरलेल्या ‘टी-२७’ वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाचे १७० हून अधिक कर्मचारी जंगलात तैनात आहेत. वेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ही मोहीम सुरू असून, वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, आरआरटी पथके आणि विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत आहे. वाघिणीला पकडण्यासाठी जंगलात विविध ठिकाणी ‘बेट’ (रेडकू व बकरे) ठेवण्यात आले आहेत. मात्र, ही वाघीण अत्यंत चतुर असून ती सतत ठिकाण बदलत आहे. विशेष म्हणजे ठेवलेले काही भक्ष्य बिबट्यांनीच फस्त केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्याच्या हल्ल्यामुळे वनविभागासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाघ हा निसर्गातील बुद्धिमान शिकारी असून तो केवळ विपरीत परिस्थितीतच मानवावर हल्ला करतो, असे त्यांनी नमूद केले. संबंधित वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
