नाशिकच्या धर्मांतर-शोषण प्रकरणानात दिल्ली टीमची धडक:150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम; महिला आयोगाकडूनही दखल
![]()
नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला असून, परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेली निदा खान ही गेल्या जवळपास २० दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तीन स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. निदा खान कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीच या संपूर्ण प्रकारणात प्रमुख भूमिका बजावत होती. दरम्यान, कंपनीच्या दिल्ली मुख्यालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक थेट नाशिकमध्ये येऊन कंपनीची ‘झाडाझडती’ घेत आहे. तपासादरम्यान कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने सुमारे 150 कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयात सध्या पूर्णपणे शांतता असून कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी जेव्हा तपासासाठी कंपनीत पोहोचले, तेव्हा त्यांना एकही कर्मचारी तेथे आढळला नाही. अधिकाऱ्यांनी शॉप अॅक्ट परवाना तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली असून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच अंतर्गत चौकशीदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यातून काही गंभीर बाबी समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कामाच्या मीटिंगच्या नावाखाली काही महिलांना लक्ष्य केले जात होते. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप आहेत. विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक आणि लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. हा सर्व प्रकार एका विशिष्ट व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चालवला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, यात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीतूनच निदा खानच्या भूमिकेचा उलगडा या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून, कंपनीची एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिचाही त्यात समावेश आहे. तिच्या चौकशीतूनच निदा खानच्या भूमिकेचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून 18 एप्रिल रोजी आयोगाचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. पीडित महिलांशी संवाद साधून संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याने या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
