![]()
मुंबईतील भुलेश्वर येथे गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तब्बल 22 फूट उंच बाप्पाची भव्य मूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला आणत असताना अचानक तोल जाऊन कोसळली. या भयंकर दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महाकाय मूर्ती रस्त्यात एका बाजूला कलंडल्याने हा मोठा अनर्थ घडला. प्राथमिक तपासानुसार, घटनास्थळी रस्त्यावर कोणतेही खड्डे आढळून आलेले नाहीत, त्यामुळे केवळ मूर्तीचा तोल गेल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे, ही मूर्ती मंडपाच्या अगदी जवळ, म्हणजे अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर आली असतानाच अचानक कोसळली. उत्सवाच्या आनंदी वातावरणात घडलेल्या या आकस्मिक घटनेमुळे भुलेश्वर परिसरात आणि गणेशभक्तांमध्ये मोठी शोककळा पसरली असून, सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती कोसळून मोठी दुर्घटना:एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी; मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली दुर्दैवी घटना
