शिवाजीनगरमधील हॉटेलमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश:परदेशी तरुणीसह तिघी ताब्यात, दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल




शिवाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी छापा टाकून परदेशी तरुणीसह एकूण तीन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला (एएचटीयू युनिट) शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून परराज्यातील एका तरुणीला ताब्यात घेतले. पुढील तपासात, सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये दलालांनी परदेशी तरुणीसह आणखी दोघींना आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथेही छापा टाकला. या कारवाईत परदेशी तरुणीसह आणखी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी दलालांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, ईश्वर आंधळे, तुषार भिवररकर, अमेय रसाळ, अविनाश शिंदे, जाधव, तसेच महिला पोलीस कर्मचारी खेडेकर, इंगळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली. आराम बस चालकाला जिवे मारण्याची धमकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस चालकाला शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना संगमवाडी भागात घडली. या प्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बस चालक मिथुन दिलीप वाघमारे (वय ३५, रा. खुळेवाडी, चंदननगर) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडीतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस थांब्यावर रिक्षाचालकाने रिक्षा लावली होती. रिक्षामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने बस चालक वाघमारे याने रिक्षाचालकाला रिक्षा काढण्यास सांगितले. या कारणावरुन रिक्षा चालकाने आराम बस चालक वाघमारे यांना शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार एस माने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *