Kalyan-Ahilyanagar Highway | कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू
Kalyan-Ahilyanagar Highway | सोमवारी (13 एप्रिल) सकाळी कल्याण -अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway) वर भीषण अपघात घडला असून संपूर्ण राज्य हादरले आहे. एका भरधाव कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात इतका भयानक होता की कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सिमेंट मिक्सर ट्रकसोबत झालेल्या जोरदार धडकेनंतर कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाहनाचा पत्रा कापावा लागला, यावरून धडकेची तीव्रता लक्षात येते.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग प्रशासनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Kalyan-Ahilyanagar Highway | मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू :
या अपघातात मृत्यू झालेल्या आठही जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याचा आणि त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. (Kalyan-Ahilyanagar Highway)
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनांचा अतिवेग आणि समोरासमोर धडक हे अपघाताचे प्रमुख कारण असू शकते.
