"आता 93 आलं, आता जायचं..":चारच दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळ यांना फोनवर म्हणाल्या- 'आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही'

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-13t083611406_1776049554.jpg




आपल्या दैवी सुरांनी अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून, सोमवारी दुपारी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे त्या सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या, मात्र प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी निधनापूर्वी अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी म्हटले होते की “आता 93 आलं, आता जायचं..”, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली. सुधीर गाडगीळ यांनी आशा भोसले यांच्याशी फोनवर झालेला संवाद सांगितला, ते म्हणाले, मी फोन केल्यानंतर आशा ताईंना विचारले की, काय म्हणताय? यावर त्या म्हणाल्या, “काय म्हणणार आता, 93 आलं, आता जायचं.. आता काही भरभरून बोलण्याचे दिवस आहेत का? आता वय 93 झालं, आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही”, असे आशा ताईंनी म्हटले. पुढे सुधीर गाडगीळ म्हणाले, आशाताईंना जवळजवळ कळल्यात जमा होतं. त्यांनी मला विचारले की “आपल्या ज्या मुलाखती आहे, त्या तुझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत ना? मी हो म्हटल्यावर त्या म्हणाल्या, “मग त्या रेकॉर्डेड मुलाखती मला एक दोन दिवसात ताबडतोब ऐकायला आणून देशील का? एक दोन दिवसांत का, तर आता प्रत्येक दिवस मला महत्त्वाचा आहे”, असे आशाताई म्हणाल्या. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असून, त्यांचे पार्थिव काल संध्याकाळी लोअर परळ येथील निवासस्थानी आणण्यात आले, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत लोअर परळच्या कासा ग्रॅंडे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी 4 वाजता दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks