नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची खोटी ईमेल पाठवून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉम्बस्फोटाच्या ईमेल धमकीने खळबळ

दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एका अज्ञात ईमेलधारकाने नांदेड जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर संदेश पाठवला होता. या ईमेलमध्ये त्याच दिवशी दुपारी ३:११ वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता. या धमकीमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

न्यायालय परिसर तातडीने रिकामे करून सखोल तपासणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुंभार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रंजने, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक मीना तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्विक रिस्पॉन्स टीम आणि वजीराबाद पोलिसांच्या पथकाने तातडीने न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायाधीशांच्या परवानगीने संपूर्ण न्यायालय परिसर तातडीने रिकामे करण्यात आला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि क्विक रिस्पॉन्स टीमच्या मदतीने न्यायालयाची संपूर्ण इमारत व परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळून आली नाही. केवळ अफवा पसरवून जनतेमध्ये घबराट निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या उद्देशाने हा ईमेल पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

सार्वजनिक शांतता बिघडवल्याप्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात ईमेलधारकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३५३ सहकलम २ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ६६ फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तांत्रिक व सखोल तपास वजीराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करत आहेत.

नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेडतर्फे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे.

 


Post Views: 15










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search