राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना सध्या वेग आला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद, अर्थमंत्रीपदाची मागणी आणि संघटनात्मक निर्णयांवरून राजकीय चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीला 32 आमदार उपस्थित होते. पक्षातील अंतर्गत प्रश्न, सत्तेतील कामांचा आढावा, शिवसेनेसोबतचे संबंध आणि आगामी राजकीय वाटचाल यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि अर्थमंत्रीपदाचा मुद्दा यामुळे पक्षाच्या राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच देवगिरीवरील या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या बैठकीत आमदारांना आपापल्या मतदारसंघातील अडचणी, पक्षातील परिस्थिती आणि सरकारमधील कामकाजाबाबत मते मांडण्याची संधी देण्यात आली. वरिष्ठ नेत्यांमधील संघर्षामुळे पक्ष कमकुवत होत असल्याची भावना बैठकीत काही आमदारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या मतभेदांबाबत थेट प्रश्न उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पातळीवर नेमके काय सुरू आहे, याची माहिती खालच्या स्तरावरील नेत्यांना आणि आमदारांना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. वरिष्ठ नेत्यांमधील संघर्षाच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असून संघटनात्मक पातळीवरही संभ्रम निर्माण होत असल्याचे मत काही आमदारांनी मांडले. पक्ष सत्तेत सहभागी असतानाही अनेक मतदारसंघांमधील कामे मार्गी लागत नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. सरकारमध्ये सहभागी असूनही आमदारांना अपेक्षित सहकार्य मिळत नसेल, तर त्याचा परिणाम मतदारांमध्ये पक्षाच्या विश्वासार्हतेवर होऊ शकतो, अशी भावना व्यक्त करण्यात आली. शिंदेंच्या शिवसेनेकडून कामे होत नसल्याची आमदारांची तक्रार महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेबाबतही काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सत्तेत एकत्र असतानाही घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असेल, तर त्याचा फटका स्थानिक पातळीवर बसतो. मतदारसंघातील विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि विविध प्रस्तावांबाबत अडचणी येत असल्याचे काही आमदारांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वयाचा प्रश्नही या बैठकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. अर्थमंत्रीपदाबाबत वरिष्ठांना विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थमंत्रीपदाची मागणी होत असल्याची चर्चा यापूर्वीपासूनच सुरू आहे. याच मुद्द्यावर बैठकीत पक्षातील एका माजी मंत्र्याने वरिष्ठ नेत्यांकडे विचारणा केल्याची माहिती आहे. अर्थमंत्रीपदाबाबत नेमकी काय चर्चा झाली? या मागणीचे पुढे काय झाले? पक्षाची याबाबतची भूमिका काय आहे? असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे समजते. राज्याच्या अर्थसंकल्पाशी संबंधित निर्णयांमध्ये पक्षाला महत्त्वाची भूमिका मिळावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अर्थमंत्रीपदाचा मुद्दा केवळ मंत्रिपदापुरता मर्यादित न राहता पक्षातील राजकीय ताकद आणि सरकारमधील स्थानाशी जोडला जात असल्याचे चित्र आहे. मात्र, या विषयावर बैठकीत नेमका कोणता अंतिम निर्णय झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठांची नाराजी या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर काही वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली नाराजी. पक्षातील महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या करताना वरिष्ठ नेत्यांना तसेच कोअर कमिटीतील सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी पुरेशी चर्चा झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. संघटनेतील नियुक्त्या आणि धोरणात्मक निर्णय हे सामूहिक चर्चेतून व्हायला हवेत, अशी भूमिका काही वरिष्ठांनी मांडल्याचे समजते. यावर पार्थ पवार आणि जय पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतले जातील, असा विश्वास दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील नव्या नेतृत्वाची कार्यपद्धती आणि अनुभवी नेत्यांचा सहभाग यावरून सुरू असलेली चर्चा या बैठकीतही केंद्रस्थानी राहिल्याचे दिसून आले. आमदारांना दुष्काळी दौरे करण्याच्या सूचना बैठकीत केवळ पक्षांतर्गत राजकारणावरच चर्चा झाली नाही, तर राज्यातील दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात दुष्काळी दौरे करण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती प्रत्यक्ष पाहून शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न यांचा आढावा घेऊन प्रशासनापर्यंत त्यांची बाजू पोहोचवण्याची भूमिका पक्षाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या मतदारसंघात दुष्काळी दौरे करताना दिसू शकतात. बैठकीला 32 आमदारांची उपस्थिती देवगिरी निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे 32 आमदार उपस्थित होते. यामध्ये पक्षातील वरिष्ठ नेते, माजी मंत्री, मंत्री आणि विधान परिषदेच्या सदस्यांचाही समावेश होता. बैठकीला उपस्थित असलेले आमदार : अनिल पाटील प्रताप पाटील चिखलीकर संजय बनसोडे धनंजय मुंडे पंकज भुजबळ नितीन पवार बाबासाहेब पाटील दत्ता भरणे सरोज अहिरे शेखर निकम इंद्रनील नाईक विक्रम काकडे सना मलिक छगन भुजबळ झिशान सिद्दीकी दिलीप वळसे पाटील विजयसिंह पंडित अदिती तटकरे अण्णा बनसोडे इद्रिस नाईकवाडी हसन मुश्रीफ माणिकराव कोकाटे मनोज कायंदे दाते गुरुजी मकरंद आबा पाटील सुलभा खोडके शंकर मांडेकर दौलत दरोडा माऊली कटके सुनील शेळके दिलीप बनकर नरहरी झिरवळ राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींना वेग येणार? एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद, दुसरीकडे अर्थमंत्रीपदाचा प्रश्न आणि आता पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून व्यक्त झालेली नाराजी, अशा अनेक मुद्द्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. त्यातच महायुती सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेनेकडून कामे होत नसल्याची आमदारांची तक्रार पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे. देवगिरीवरील बैठकीत आमदारांनी आपली मते मांडली असली, तरी या मुद्द्यांवर पक्षाचे नेतृत्व पुढे काय भूमिका घेणार, वरिष्ठ नेत्यांमधील समन्वय कसा साधला जाणार आणि सरकारमधील घटक पक्षांसोबतचे संबंध कसे सुधारले जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. MHT-CET घोटाळ्यावरून राजकीय संघर्ष:रोहित पवारांच्या ऑडिओ क्लिपवर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचं स्पष्टीकरण राज्यातील एमएचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात पैशांच्या जोरावर फेरफार होत असल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी काही ऑडिओ क्लिप, शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन आणि सादरीकरणाच्या माध्यमातून या प्रकरणातील गंभीर आरोप समोर आणले. निकालात फेरफार करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण करणारे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सविस्तर वाचा…

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search