वचपा घेण्यासाठीच मारहाण; सुमारे 100 फुट फरफटत नेले:दोन्ही मारेकऱ्यांनी किरकोळ कारणासाठी केला खून
![]()
शहरातील अकोली परिसरात गुरुवारी (दि. ९) किरण कमलाकर पुणतांबेकर (४६) यांची दोघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आकाश धुर्वे आणि स्वप्नील चतूर या दोघांना गुरुवारी रात्रीच गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरुवारी दुपारी किरण यांचा अकोली भागातील दारूच्या दुकानात दोन तरुणांसोबत वाद झाला होता. वाद सुरू असतानाच आकाश व स्वप्नील दारूच्या दुकानात गेले. या दोघांनी किरण यांच्या वादात मध्यस्थी केली. त्यावेळी किरण यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातच किरण यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास किरण पुणतांबेकर अकोली परिसरातील एका देशी दारूच्या दुकानात गेले होते. तिथे काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या खिशातील १०० रुपये काढल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याच दरम्यान आकाश धुर्वे आणि स्वप्नील चतूर हे दोघेही त्या दुकानात पोहोचले. किरण पुणतांबेकर आणि या दोन्ही आरोपींची आधीची कोणतीही ओळख नव्हती. मात्र सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी आकाश आणि स्वप्नील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या किरण यांनी या दोघांनाही शिवीगाळ केली. हीच शिवीगाळ आरोपींच्या मनाला लागली. त्यांनी बदला घेण्याचे ठरवले. शिवीगाळीचा वचपा काढण्यासाठी आकाश आणि स्वप्नील यांनी किरण यांना जबरदस्तीने स्वतःच्या दुचाकीवर बसवले. त्यांना अकोली परिसरातील एका क्रिकेट मैदानावर नेले. तिथे सुरुवातीला त्यांना थपडांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी काठीने मारले. किरण यांच्याच पॅन्टचा बेल्ट काढून त्यांना बेदम मारले. मारहाण केल्यानंतर दोघांनीही किरण यांना सुमारे शंभर फूट फरफटत नेऊन टाकले. तिथून पळ काढला. मारहाणीमुळे झालेल्या गंभीर अंतर्गत जखमा आणि कडाक्याचे ऊन यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी पडलेल्या चपला. आकाशविरुध्द पुर्वीच दोन गुन्हे या खून प्रकरणातील आरोपी आकाश धुर्वे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर मे २०२२ मध्ये दुचाकी चोरीचा आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुध्द हे दोन्ही गुन्हे खोलापूरी गेट पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
