भव्य भीमगीतांनी दुमदुमले नगर शहर; नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद
![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. गुरुवारी माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. “बाबासाहेबांचा विजय असो”, “जय भीम म्हणत चला”, “भीमराजा माझा”, “निळ्या झेंड्याखाली”,“उठा उठा हो भीमसैनिकांनो” यांसारख्या भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने भीमसैनिक व नागरिकांनी उपस्थिती लावत कार्यक्रम ऐतिहासिक ठरवला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी गायक आनंद शिंदे यांचा सत्कार केला. नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले, अहिल्यानगरमध्ये भीम उत्सव बौद्ध पौर्णिमेपर्यंत महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे. १४ एप्रिल रोजी भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमामुळे संपूर्ण शहर भीममय झाले असून आंबेडकरी समाजासह सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, प्रा. जयंत गायकवाड, विलास साठे, शरद मेढे, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, मुन्ना भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, सतीश शिरसाट, जय कदम, विशाल कांबळे, प्रा. डी. आर. जाधव, सचिन शेलार, सागर ठोकळ, गौरव साळवे, गौतमी भिंगारदिवे, येसूदास वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
