विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा:देवगाव येथे तहसीलदार नाईकवाडे यांचे आवाहन
![]()
लासलगाव यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू लागला आहे. स्पर्धा परीक्षांचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता सातत्यपूर्ण अभ्यास करावा, असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले. देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर व श्री. डी. आर. भोसले विद्यालयात आयोजित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे शिवकालीन शस्त्रांचे फिरते प्रदर्शन आयोजित केले होते, याप्रसंगी तहसीलदार नाईकवाडे बोलत होते. पुरातत्त्व विभाग व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि मविप्र समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नाईकवाडे यांनी शिवशस्त्रशौर्यगाथा प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती लक्षात येत असून, प्रदर्शनातील केवळ शस्त्रे नाहीत, तर तो एक सजीव वारसा आहे. महाराजांच्या देदीप्यमान इतिहासातून युवा पिढीने प्रेरणा व आदर्श घेऊन कार्यरत राहण्याचे आवाहन केले. भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र भाबड, बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे, माजी पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजीराम खुळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
