देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली:संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा; ऑपरेशन टायगरवर पलटवार
![]()
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगर या नावाने सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाने मात्र या दाव्यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. राऊतांनी सूचक शब्दांत सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आठ खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात झालेल्या एका कथित गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे. शिवसेनेचे नऊ खासदार एकजुटीने एकत्र आहेत, त्यांच्यात कोणतीही फूट पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. ठाकरे गटातील एकाही खासदाराला फोडणे शक्य नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना थेट आव्हान दिले. त्यामुळे ऑपरेशन टायगर, खरेच यशस्वी होणार की फक्त राजकीय हवा आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या माझं आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील राऊत यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांनाही फेटाळून लावत ठाकरे गटातील एकजूट अधोरेखित केली. आमचे नऊ खासदार एकत्र आहेत. काही नावं वाचून मला हसू आलं. उद्या माझं आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, या प्रकारच्या बातम्या केवळ वातावरण तापवण्यासाठी किंवा काहीतरी घडत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. पैसा तुमच्या बापाच्या खिशातला आहे का? यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निधी वाटपाबाबतही गंभीर आरोप केले. विरोधी पक्षाच्या खासदारांना विकासासाठी निधी दिला जात नाही, हा मोठा अन्याय आहे, असे ते म्हणाले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, मात्र विरोधकांना वंचित ठेवले जाते, असा आरोप करत त्यांनी, हा पैसा तुमच्या बापाच्या खिशातला आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला. फडणवीस यांना देखील सल्ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सल्ला दिला. जर त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं व्हायचं असेल, तर संकुचित विचार सोडले पाहिजेत, असे ते म्हणाले. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व केवळ काही मर्यादित काळापुरतेच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
